सोमवार, २२ ऑक्टोबर, २०१२

आकाश माती यांच्या काजळमायेचं नातं

AÉMüÉzÉ qÉÉiÉÏ rÉÉÇcrÉÉ MüÉeÉVûqÉÉrÉåcÉÇ lÉÉiÉÇ
iÉÑOûiÉÉ iÉÑOûiÉ lÉÉWûÏ
U£ümÉæÇeÉhÉÉcrÉÉ ÌlÉlÉÉSÉiÉ
eÉZÉqÉÉÇcÉÇ SåhÉÇ
ÌTüOûiÉÉ ÌTüOûiÉ lÉÉWûÏ

गुरुवार, २६ जानेवारी, २०१२

गणतंत्र / दोन कविता


कोणत्याही
प्रकारचे
नसलेले
ताळतंत्र : गणतंत्र


भावार्थ
हरवलेल्या
शब्दांचा
कलेवरी मंत्र : गणतंत्र

मंगळवार, २४ जानेवारी, २०१२

संकल्प-

अर्धे वर्ष सरत आले तरी
अजून मी वाचले नाही
माझे राशीभविष्य !!
विश्वास नाही, असे नाही
पण सवडच मिळाली नाही
कार्यव्यापात बुडून गेलेल्या या वर्तमानात
आता मी एक केला आहे संकल्प
संपूर्ण राशीभविष्य वाचून काढण्याचा
निदान नूतन वर्ष सुरू होण्यापूर्वी तरी...

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

कवी / तीन कविता-


॥१॥

कवी : कविता करण्याचे काम करणारा.


॥२॥

कवी : काम करताना कविता करणारा.


॥ ३ ॥

कवी : कामाचीच कविता करणारा...

सोमवार, १६ जानेवारी, २०१२

तीन कविता कँल्क्युलेटरच्या-


इन-मिन-तीन रुपयांचा हिशोब मी
पाव-एक मिनिटांत दिला
पण माझ्यापेक्षा त्याचा विश्वास
कँल्क्युलेटरवरच अधिक दिसला...

२.
पूर्वी तो
बेरजेची सर्व गणिते
हाताच्या बोटांवरच असे करीत,
आजही तो तसाच हिशोब करतो
मात्र बोटे कँल्क्युलेटरवर नाचवीत...

३.
हातात कँल्क्युलेटर घेऊन
मोजू लागला तो
आकाशस्थ अगणित तारे-
आणि मग मोजता मोजता चमकू लागले
त्याच्या डोळ्यांपुढे-
आकाशस्थ अगणित तारे-

रविवार, १५ जानेवारी, २०१२

हे देवा-

हे देवा,
तू मला कावळा- चिमणी कर,
किडा-मुंगी कर,
गाढव, डुक्कर कर,
कुत्रा-मांजर कर,
कृमी-कीटक कर,
कोण हवे ते कर, काय हवे ते कर...तत्सम,
संस्कारशून्य, संस्कृतीशून्य...
कारण-
कारण त्यांना जगावे लागत नाही रे,
माणसांसारखे....

गुरुवार, १२ जानेवारी, २०१२

कणिका-

‘म्हणतात माऊली -’ येते आरंभाला
‘म्हणतात तुकोबा -’ शेवट हा ठरलेला
कीर्तनात अवघ्या बुडून जातो गाव...
संतांची वचने तेथे नित तो कथितो,
चुकुनहि ना कथितो, स्वत: काय तो म्हणतो...

मी, आम्ही, तुम्ही, तो, ती,ते अन त्याही-
कोणीच कधी वा येथ निधर्मी नाही
ही गाय, बैल वा घोडा, गाढव अथवा...
-शोधिता आढळे एक परंतु तैसा,
आढळे निधर्मी एकच - केवळ पैसा!!

त्वेषात धावले तिकडुनि ‘कुराण’ वाले
त्वेषात इकडुनि, तसेच ‘पुराण’ वाले
तलवारी, भाले, विळे, कोयते, ढाली...
मग परस्परांनी दिले-घेतले प्राण
मानवता हतबल, गलितगात्र, निष्प्राण!!

पूर्वीचे काही उरले नाही आता
ते प्रेम, जिव्हाळा,आत्मिय माया, ममता-
गाठते रसातळ अवमूल्यन मूल्यांचे...
संतांची वाणी घेते अंतिम श्वास
साबणाससुद्धा ये ना आता फेस...

मग उत्साहाने जावे धरण्या काही
हातास लागते उलटे काहीबाही-
हे नशिब तुटके, फुटके, विटके रकटे...
नववेलींवरची नवकुसुमे सुकुमार,
नजरेच्या स्पशे-सुकुनी, हो निर्माल्य!!

शेवटी हजारो लोकांच्या साक्षीने
घेतला पेट, क्षण गमले की गगनाने-
जन गर्जु लागले मोदे,‘रावण मेला!”
मग मनात आले रावण कसला मेला
होऊन ‘चिरंजिव आठवा’ आहे बसला...

शनिवार, ७ जानेवारी, २०१२

आणीबाणी

घरात पाय ठेवताक्षणीं कधीच प्रसन्न दिसली नव्हती
आज मात्र गोड हंसून ‘हार्दिक स्वागत’ करीत होती
रस्त्यामध्ये भेटूनसुद्धा तोंड फिरवून जात होते-
तेच मित्र आज येवून विचार-पूस करीत होते
सणवार-उत्सव अथवा दसरा-दिवाळी काहीच नव्हते
ओळखीचे वा ओळख काढून लोक येवून भेटत होते
वाटेवरचा कुत्रासुद्धा हुडुत म्हणता हलत नव्हता
तोही आज इमानाची शेपूट हलवीत उभा होता
असे कसे घडले आज, कळले नाही, कळत नव्हते-
तसे काही घडले नव्हते, फक्त ‘पेमेंट’ झाले होते!!

गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

आता या झाडाला-

आता या झाडाला
कळ्या लागत नाहीत
फुले येत नाहीत
फळे लागत नाहीत
पालवी फुटत नाही
फुटतात,
फक्त फांद्या...

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

अलीकडे

अलीकडे,
काळ्या पाषाणखंडाचा
मला हेवा वाटू लागलाय
कारण-
पाषाणाला ह्र्दय नसते-
विदीर्ण व्हायची भीती नसते,
पाषाणाला मेंदू नसतो-
सडून जायची काळजी नसते...

अलीकडे,
अग्नीचाही मला
हेवा वाटू लागलाय
कारण-
अग्नीला स्वत:चे घर नसते-
जळून जायचे भय नसते,
अग्नीला स्वत:चा देह नसतो-
राख व्हायची चिंता नसते...

अलीकडे-

सोमवार, १९ डिसेंबर, २०११

जंगल

पूर्वी
या रस्त्यावर
गर्द सावली होती
आणि दुतर्फा,
घनदाट हिरवेगार जंगल!!
आज-
या रस्त्यावर
गर्द सावली आहे
आणि दुतर्फा,
घनदाट सिमेंटचे जंगल...

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

. पाच कविता

1.
फूल उमलू लागले,
की मला उन्मळून येते
निर्माल्याच्या राशीत
आणखी एकाची भर पडते....

2.
या गावातील सा~या भिंती
दगडाच्या आहेत
भिंतीमधले दगड सोडले तर
सगळे दगडच आहेत!

3.
इथल्या बंगलीतल्या प्रत्येक बाबूला
खिडकीसाठी लागते अशी काच
जिच्यातून दिसते बाहेरचे स्पष्ट
आतले मात्र अजिबात!!

4.
कितीही खाल्लं तरी
त्याच्या अंगाला अन्नच लागत नाही...
लागणार कसं?
चमच्याशिवाय त्याच्या पोटात
अन्नाचा कणही जात नाही..

5.
माझे घेतलेले पैसे
कोणीच बुडविले नाहीत,
हा माझा अनुभव आहे!
ज्यांनी बुडविले,
ते पैसे माझे नव्हते
अशी माझी श्रद्धा आहे!

रविवार, ४ डिसेंबर, २०११

फूल

सहस्र सूर्य आले तरी सुकणार नाहीत आता फुले
सहस्त्र रात्री आल्या तरी मिटणार नाहीत आता फुले
रंगीत पंख भिरभिरवीत फुलपाखरू वळणार नाही
मधमाशांचा तसाच थवा, गुणगुण-त्रास देणार नाही
शेजारच्या त्या दोन्ही कार्टय़ा, फुले चोरायला येणार नाहीत
तशाच त्यांच्या परड्यासुद्धा हसत हसत जाणार नाहीत
वाटेल हेवा फुलांस तुमच्या जन्मानंतर मरणा~या
मत्सरसुद्धा तसाच त्यांना, जन्मापूर्वी मरणा~या
निर्माल्यून जाणार नाहीत कधीच आता माझी फुले
सुकून-मिटून जात नसतात कध्धी कध्धी कागदी फुले...

गुरुवार, १ डिसेंबर, २०११

. निवारा

विस्कटलेल्या रेषेला
दे,
चित्रांचा थारा...

ओघळलेल्या रंगाला
दे,
कुंचल्याचा आसरा...

थरथरणा~या
स्वराला,
दे,
षड्जाचा निवारा...

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

शाई

आजपर्यंत खूप लिहिले, खूप खर्ची घातले ताव
पांढ~यावरती काळे करून लेखनावरती मारला ताव
आखिव-कोरे मिळतील ते ते, सारे टाक वापरले
हिरवी, काळी, निळी शाई-सारे रंग वापरले
कथा, नाटके खूप लिहिली, कवितांना गणती नाही
सुचेल तेव्हा लिहीत गेलो, सुचत नव्हते तेव्हाही
कुणि वदले, ‘ दे फेकुन शाई- कर रक्ताची, आणि लिही-’
सारे होते जमले, परंतु हेच मात्र जमले नाही
अर्थ याचा असा नव्हे, की अंगामध्ये नव्हते रक्त
लिहिता लिहिता त्यचीही पण झाली होती ‘कँमल इंक”

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

देणे

मोल ज्याचे करता न ये, माय-पित्याने जन्म दिला
वातीसारखे जळून, केले लहानग्याचे मोठे मला
शाळेमधल्या चिमण्या जगात आचार्यांनी पाठ दिला
‘कसे जगावे, कसे मरावे-’ अमरत्वाचा मंत्र दिला
घरामागच्या मैदानाने खूप खूप अपरूप दिले
नाना खेळ शिकवून त्याने चैतन्याचे पाट दिले
नित्यनूतन निसर्गदेवीने अमाप, अमाप दिले मला
जेव्हा आले डोळां पाणी- तिनेच तेव्हा धीर दिला
दात्यांचे ते हात पाहून लाज वाटते माझीच मला
काहीच नाही आपण दिले, फक्त त्याना ताप दिला...

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

देवपूजा-

फुले चढवून
भक्तीभावे केलेली
तुमची देवपूजा,
मी उत्तरपूजा मानतो...
कारण-
ती फुले
आधीच उतरविलेली असतात
फुलखाडांवरून,
-ज्यांना मी देव मानतो!

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०११

अश्रू

आई-बाप-भाऊसुद्धा जेव्हा सोडून गेले होते
तेव्हासुद्धा माझे डोळे मुळीच ओले झाले नव्हते
फार काय, ‘सौ.’ ही जेव्हा रुसून गेली होती दूर
तेही सहन केले, मात्र डोळां नव्हता आला पूर
पहिल्या, दुस~या, तिस~या, चौथ्या-थेट सा~या यत्तांमध्ये
नापास होत गेलो तरी, डोळ्यात पाणी आले नव्हते
किती किती दु:खे आली, रडवायला माझ्याकडे
नाही रडलो, रडत गेली तीच पाहत माझ्याकडे
अश्रू गाळून कोणापुढे कधीच मागत नाही भीक
अपवाद एक-जेव्हा येतो दाढी करण्याला नाभिक...

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

आभाळ घनांनी भरले...

आकाश घनांनी भरले-
मयुरांच्या पदिं निद्रित नर्तन,
अजि जागृत जाहले
आकाश घनांनी भरले...

आकाश घनांनी भरले
कैक मास-ऋतु तृषार्त व्याकुळ
चातक चोचि उघडले,
आकाश घनांनी भरले...

आकाश घनांनी भरले-
गर्भवती वसुधेस वाटले,
आपुले
दिवस भरुनी आले,
आकाश घनांनी भरले...

आकाश घनांनी भरले-
थेंब टपोरे अंगण गरगर,
भिंगोरी बनले...
अभाळ घनांनी भरले...