गुरुवार, २९ डिसेंबर, २०११

आता या झाडाला-

आता या झाडाला
कळ्या लागत नाहीत
फुले येत नाहीत
फळे लागत नाहीत
पालवी फुटत नाही
फुटतात,
फक्त फांद्या...

सोमवार, २६ डिसेंबर, २०११

अलीकडे

अलीकडे,
काळ्या पाषाणखंडाचा
मला हेवा वाटू लागलाय
कारण-
पाषाणाला ह्र्दय नसते-
विदीर्ण व्हायची भीती नसते,
पाषाणाला मेंदू नसतो-
सडून जायची काळजी नसते...

अलीकडे,
अग्नीचाही मला
हेवा वाटू लागलाय
कारण-
अग्नीला स्वत:चे घर नसते-
जळून जायचे भय नसते,
अग्नीला स्वत:चा देह नसतो-
राख व्हायची चिंता नसते...

अलीकडे-

सोमवार, १९ डिसेंबर, २०११

जंगल

पूर्वी
या रस्त्यावर
गर्द सावली होती
आणि दुतर्फा,
घनदाट हिरवेगार जंगल!!
आज-
या रस्त्यावर
गर्द सावली आहे
आणि दुतर्फा,
घनदाट सिमेंटचे जंगल...

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

. पाच कविता

1.
फूल उमलू लागले,
की मला उन्मळून येते
निर्माल्याच्या राशीत
आणखी एकाची भर पडते....

2.
या गावातील सा~या भिंती
दगडाच्या आहेत
भिंतीमधले दगड सोडले तर
सगळे दगडच आहेत!

3.
इथल्या बंगलीतल्या प्रत्येक बाबूला
खिडकीसाठी लागते अशी काच
जिच्यातून दिसते बाहेरचे स्पष्ट
आतले मात्र अजिबात!!

4.
कितीही खाल्लं तरी
त्याच्या अंगाला अन्नच लागत नाही...
लागणार कसं?
चमच्याशिवाय त्याच्या पोटात
अन्नाचा कणही जात नाही..

5.
माझे घेतलेले पैसे
कोणीच बुडविले नाहीत,
हा माझा अनुभव आहे!
ज्यांनी बुडविले,
ते पैसे माझे नव्हते
अशी माझी श्रद्धा आहे!

रविवार, ४ डिसेंबर, २०११

फूल

सहस्र सूर्य आले तरी सुकणार नाहीत आता फुले
सहस्त्र रात्री आल्या तरी मिटणार नाहीत आता फुले
रंगीत पंख भिरभिरवीत फुलपाखरू वळणार नाही
मधमाशांचा तसाच थवा, गुणगुण-त्रास देणार नाही
शेजारच्या त्या दोन्ही कार्टय़ा, फुले चोरायला येणार नाहीत
तशाच त्यांच्या परड्यासुद्धा हसत हसत जाणार नाहीत
वाटेल हेवा फुलांस तुमच्या जन्मानंतर मरणा~या
मत्सरसुद्धा तसाच त्यांना, जन्मापूर्वी मरणा~या
निर्माल्यून जाणार नाहीत कधीच आता माझी फुले
सुकून-मिटून जात नसतात कध्धी कध्धी कागदी फुले...

गुरुवार, १ डिसेंबर, २०११

. निवारा

विस्कटलेल्या रेषेला
दे,
चित्रांचा थारा...

ओघळलेल्या रंगाला
दे,
कुंचल्याचा आसरा...

थरथरणा~या
स्वराला,
दे,
षड्जाचा निवारा...

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

शाई

आजपर्यंत खूप लिहिले, खूप खर्ची घातले ताव
पांढ~यावरती काळे करून लेखनावरती मारला ताव
आखिव-कोरे मिळतील ते ते, सारे टाक वापरले
हिरवी, काळी, निळी शाई-सारे रंग वापरले
कथा, नाटके खूप लिहिली, कवितांना गणती नाही
सुचेल तेव्हा लिहीत गेलो, सुचत नव्हते तेव्हाही
कुणि वदले, ‘ दे फेकुन शाई- कर रक्ताची, आणि लिही-’
सारे होते जमले, परंतु हेच मात्र जमले नाही
अर्थ याचा असा नव्हे, की अंगामध्ये नव्हते रक्त
लिहिता लिहिता त्यचीही पण झाली होती ‘कँमल इंक”

शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

देणे

मोल ज्याचे करता न ये, माय-पित्याने जन्म दिला
वातीसारखे जळून, केले लहानग्याचे मोठे मला
शाळेमधल्या चिमण्या जगात आचार्यांनी पाठ दिला
‘कसे जगावे, कसे मरावे-’ अमरत्वाचा मंत्र दिला
घरामागच्या मैदानाने खूप खूप अपरूप दिले
नाना खेळ शिकवून त्याने चैतन्याचे पाट दिले
नित्यनूतन निसर्गदेवीने अमाप, अमाप दिले मला
जेव्हा आले डोळां पाणी- तिनेच तेव्हा धीर दिला
दात्यांचे ते हात पाहून लाज वाटते माझीच मला
काहीच नाही आपण दिले, फक्त त्याना ताप दिला...

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

देवपूजा-

फुले चढवून
भक्तीभावे केलेली
तुमची देवपूजा,
मी उत्तरपूजा मानतो...
कारण-
ती फुले
आधीच उतरविलेली असतात
फुलखाडांवरून,
-ज्यांना मी देव मानतो!

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०११

अश्रू

आई-बाप-भाऊसुद्धा जेव्हा सोडून गेले होते
तेव्हासुद्धा माझे डोळे मुळीच ओले झाले नव्हते
फार काय, ‘सौ.’ ही जेव्हा रुसून गेली होती दूर
तेही सहन केले, मात्र डोळां नव्हता आला पूर
पहिल्या, दुस~या, तिस~या, चौथ्या-थेट सा~या यत्तांमध्ये
नापास होत गेलो तरी, डोळ्यात पाणी आले नव्हते
किती किती दु:खे आली, रडवायला माझ्याकडे
नाही रडलो, रडत गेली तीच पाहत माझ्याकडे
अश्रू गाळून कोणापुढे कधीच मागत नाही भीक
अपवाद एक-जेव्हा येतो दाढी करण्याला नाभिक...

शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

आभाळ घनांनी भरले...

आकाश घनांनी भरले-
मयुरांच्या पदिं निद्रित नर्तन,
अजि जागृत जाहले
आकाश घनांनी भरले...

आकाश घनांनी भरले
कैक मास-ऋतु तृषार्त व्याकुळ
चातक चोचि उघडले,
आकाश घनांनी भरले...

आकाश घनांनी भरले-
गर्भवती वसुधेस वाटले,
आपुले
दिवस भरुनी आले,
आकाश घनांनी भरले...

आकाश घनांनी भरले-
थेंब टपोरे अंगण गरगर,
भिंगोरी बनले...
अभाळ घनांनी भरले...

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

बुजगावणे / सात कविता

॥१॥
पिकाची राखण म्हणून
बुजगावण्याची नेमणूक केली
एक दिवस सारी जमीन
बुजगावण्यानेच हडप केली

॥२॥
जेव्हा
बुजगावणीच कसू लागतात
ताब्यात शेत घेऊन
शेतक~याला जगावे लागते
केवळ एक बुजगावणे म्हणून...

॥३॥
गच्च कणसातील
प्रत्येक दाण्याचे करावयाचे असते,
बुजगावण्याने संरक्षण
न करता कणाचेही भक्षण...

॥४॥
पिकाची राखण म्हणून
बुजगावण्यास उभे केले
बघता बघता एक दिवस,
बुजगावणेच चोरीस गेले...

॥५॥
ही बुजगावणी
शेतातच खत होणारी
खत खाल्लेल्या पिकाची
राखण करणारी...

॥६॥
तिन्हीसांज टळल्यावर
अवघे आकाशच बनते
एक भेसूर बुजगावणे,
चुनेरी टिळ्याटिळ्यांचे..

॥७॥
सारी बुजगावणीच
या शेतातली,
‘त्या’ बुजगावण्याच्या....
(विशाखा : दिवाळी-२०००/ पुणे)

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

सात कविता

॥१॥
खुर्चीत बसलेल्या लहान मुलांचे पाय
जमिनीला टेकत नाहीत,
लहान मुलांचेच कशाला?
मोठयांचेही टेकत नाहीत...

॥२॥
तो चेनस्मोकर
रात्रंदिवस धूम्रपान करतो,
देवापुढची उदबत्तीही तो
सिगारप्रमाणे पेटवतो!

॥३॥
मृगशीर्ष-गुरुवार उजाडला,
की मला भीती वाटू लागते,
फक्त मलाच नाही-
फळझाडांनाही वाटू लागते...

॥४॥
गडद, गार, भोर, भडक-
शुभ्र, धम्मक, जर्द, किट्ट,
शब्दांच्या दुनियेतही असते
रंगांची एक बाजारपेठ!

॥५॥
कळीला पदर आल्याची वार्ता
वा~यासारखी पसरली,
फुलपाखरांनी गर्दी केली!

॥६॥
एक मोलकरीण
बारा घरचं धुणं-भांडी करते
अनुवादकाचे कामसुद्धा आणखी काय असते?

॥७॥
हे फूल....मलूल!
निजजीवनाचा गंध देता देता
सुकलेले......सुखावलेले!!
(‘बेळगाव समाचार’- बेळगाव/ दिवाळी-२००१)

रविवार, १३ नोव्हेंबर, २०११

कधीच

कधीच आले नाही त्यांच्या वाटयाला
उपेक्षेचे गहिरे दु:ख,
अपेक्षेच्या वाटेला ते कधी गेलेच नव्हते...

कधीच वाटला नाही त्यांना
काळोखसुद्धा, काळोख!!
प्रकाशाची ऒळख कधी झालीच नव्हती...

कधीच वाटली नाही त्यांना
आपल्या मरणाची भीती,
जगण्याची ऒढ कधी जन्मलीच नव्हती...

कधीच घेरले नव्हते त्यांना
निराशेच्या काजळीने,
आशेची वात कधी लागलीच नव्हती...

कधीच कोणाला समजले नाही त्यांनी
केव्हा हलविला आपला मुक्काम,
वस्तीची नोंद कुणी घेतलीच नव्हती...

(‘आघाडी’-दिवाळी अंक/मालवण/२००१)

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०११

रत्न

बाहेर काळाकिट्ट अंधार घोंघावत होता...
आणि मी चालत होतो कंदिलाच्या प्रकाशात,
शोधत एक अनमोल रत्न... हरवलेले,
ज्याच्या प्रकाशात जाणार होता उजळून
सारा अंधार,
भोवतालचा आणि आतलाही!

चौकाचौकात, वळवळणावर, कोप~याकोप~यावर
दिसत होती असंख्य माणसे
म्हटल्यास ओळखीची, म्हटल्यास अनोळखी
विचारीत होतो त्यांना,
शोधत होतो त्यांच्या चेह~यावर
पाहत होतो त्यांच्या डोळ्यातून थेट आत-
-तीही दाखवीत होती रत्ने काढून काळीजखिशातून...

असंख्यांची असंख्य रत्ने, पण-
एकाच प्रकारची
फक्त आपलाच चेहरा उजळविणारी,
काजव्यासारखी...
मला तर हवे होते रत्न,
साराच अंधार तेजाळ करणारे!

चालता चालता मला जाणवले
पंधरा-वीस गल्ल्या ओलांडून
आलो आहोत आपण गावाबाहेर-स्मशानरस्त्यावर...
मी परतणार
तेवढ्यात एका चकचकीत शुभ्र तुकड्याने
खेचून घेतले माझे डोळे-
तो होता एक फार्म, जीर्ण...
मळकटलेला,
कुणीतरी, केव्हातरी खरडलेला...
मी वाचू लागलो कंदिलाच्या मंद प्रकाशात-
अर्जदाराचे नाव, गाव, धर्म, पंथ, जात-
सारे सारे अस्पष्ट होते,
(सूक्ष्मदर्शक यंत्रातून दिसलेही असते कदाचित)

-आणि, आणि मला अत्यानंद झाला
जे रत्न शोधत होतो ते गवसल्याचा!
अर्जदाराने लिहिले होते-
कालम नं, ४ -
राष्ट्रीयत्व : भारतीय!!

(दै. सकाळ, कोल्हापूर, २६.जाने. १९८६)

गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

वस्त्रे

जन्माला येतानाच तू आलास-
हाती पूजेचे आकाश तबक घेऊन,
महन्मंगल स्तोत्रे गात,
आषाढ-घंटा वाजवीत,
स्वातंत्र्यलक्ष्मीचा पूजारी म्हणून!

भागीरथीच्या मनातही
मलीनभाव निर्माण करणा~या
भावजीवनाने
तू तिला स्नान घातलेस
संकल्पसिद्ध
अन लाविलेस भाळावर
पिंपळपानालाही नगण्य लेखणारे रक्तगंध!
सजविलेस, नटविलेस नखशिखांत
श्वाससुमनांनी
ज्यांना एक च माहीत होते फक्त-
फुलणे-फुलणे!

तू अजिंक्य!
पण तुलाही क्षणभर जिंकलेच
तुझ्याच डोळ्यांतील आसवांनी...
धूर्जटीमनाने सारे सारे प्राशन करणारा तू
पण तुलाही एक हुंदका फुटलाच...
म्हणालास: ‘ने मजशी ने-’

पण,
पण तुझ्या प्राणाची तळमळ
निर्दय सागराने जाणली नाही...
किनारा-दर्शनाची तुझी इच्छाकळी
त्याने उमलविली नाही...
लाटांच्या अब्ज अब्ज हातांनी
ढकलत, ढकलत शेवटी त्याने
किना~यावर एकच आणली-
तुझी वस्त्रे!
रक्तभिजली वीर वस्त्रे....
( `दै.सकाळ’-कोल्हापूर / ८ मार्च १९८७)

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

तुकडे

माणसाने कागदाचे लहान-मोठे तुकडे केले,
आणि त्यांची किंमतही ठरवली-
रुपये पाच, दहा, वीस, पन्नास-
पुढे तुकड्यांनीही तेच केले,
त्यांनी माणसाची किंमत ठरवली,
आणि माणुसकीचेच केले
तुकडे- तुकडे!!